न्यायमूर्ती नागरत्ना यांचा न्यायवृंदामध्ये होणार   

नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश होण्याच्या मार्गावर असलेल्या न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांचा आज (रविवारी) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदामध्ये समावेश होणार आहे. न्यायमूर्ती अभय एस. ओक आज निवृत्त होत असून, नागरत्ना आता न्यायवृंदाच्या सदस्या असणार आहेत.देशातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीशांमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या न्यायमूर्ती नागरत्ना यांचा आज अधिकृतपणे न्यायवृंदात समावेश होईल. त्या २९ ऑक्टोबर २०२७ रोजी सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त होईपर्यंत न्यायवृंदाचा भाग राहतील.
 
न्यायवृंदामध्ये आता विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती जे.के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती नागरत्ना यांचा समावेश असेल.  सर्वोच्च न्यायालयातील रिकाम्या पदांवर चर्चा करण्यासाठी आणि अनेक उच्च न्यायालयांमध्ये महत्त्वाच्या नियुक्त्या करण्यासाठी सरन्यायाधीश गवई उद्या (सोमवारी) न्यायवृंदाची पहिली बैठक बोलावण्याची शक्यता आहे, असे सर्वोच्च न्यायालयातील सूत्रांनी सांगितले.न्यायमूर्ती ओका यांच्या निवृत्तीनंतर सर्वोच्च न्यायालयात तीन न्यायाधीशांच्या जागा रिकाम्या असणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर १९९३ मध्ये न्यायवृंद अस्तित्वात आले.

Related Articles